सरकार तुपाशी विद्यार्थी मात्र उपाशी ते उपाशीच !!

by - 8:31 PM

सरकार तुपाशी विद्यार्थी मात्र उपाशी ते उपाशीच !!


केदार व्ही भोपे.


मो. ८०५५३७३७१८

       विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतत गळचेपी धोरण अवलंबणाऱ्या केंद्र व राज्य सरकारने नुकतेच काही दिवसांपूर्वी काही निवडक व्यावसायिक अभायास्क्रमांसाठी OBC, SBC, NT या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती या वर्षीपासून नामंजूर केली आहे. हा सरळ सरळ गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.


     BBA, BCA, या अभ्यासक्रमांसाठी ची संपूर्ण तर BCS या अभ्यासक्रमाची ५० टक्के शिष्वृत्ती नामंजूर केली आहे. त्यामुळे वरील अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना त्या त्या अभ्यासक्रमाची संपूर्ण फी भरावी लागणार आहे. आपल्या भारत देशात जवळपास ६० टक्के विद्यार्थी हे शिष्वृत्ती धारक आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने गरीब, शेतकरी, कष्टकरी विद्यार्थ्याचा समावेश होतो.व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ऐपत नसतांना विद्यार्थी फक्त शिष्यवृत्ती च्या आशेवर प्रवेश घेतो. आज आपण जर या व्यावसायिक अभ्यासक्रमाची फी पाहिल्यास आपल्याला यामागचे भयानक वास्तव समोर पडेल.

     आपण जर BBA या एकाच अभ्यासक्रमाची फी विचारात घेतली तर आपल्याला असे लक्षात येईल कि जर प्रथम वर्षाची फी २२००० रु.असेल आणि त्याच अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यासाठी हीच फी फक्त ११०० रु असेल तर त्याला शिष्यवृत्ती रद्द झाल्याने संपूर्ण फी म्हणजे २२००० रु. भरावी लागणार आहे. गरीब विद्यार्थी जो दारिद्र रेषेखालील आहे, ज्याच्या संपूर्ण कुटुंबाचे महिन्याचे उत्पन्न फक्त दीड ते दोन हजार आहे अशा विद्यार्थ्याने हि फी भरायची कशी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.अशा या गरीब विद्यार्थ्याला फी भरणे शक्य न झाल्यास एखाद्या दुसऱ्या अभ्यासक्रमाला ज्याची फी कमीत कमी आहे त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा झाल्यास त्या विद्यार्थ्याला त्याच्या जुन्या अभ्यासक्रमाची संपूर्ण फी भरल्याशिवाय महाविद्यालयातून दाखलाही मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची “इकडून आड, तिकडून विहीर”अशी अवस्था झाली आहे.

     अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर शासनाकडून विविध प्रकारे अन्याय होत असतांना काही तुरळक विद्यार्थी संघटनांचा अपवाद सोडला तर इतर काही विद्यार्थी संघटना ज्या नको त्या वेळेस स्वतः ला ‘विद्यार्थ्यांचे कैवारी’ म्हणवून घेतात, आम्ही कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे वारंवार ओरडून सांगणाऱ्या त्या कथित संघटना विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात एक शब्द हि बोलण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांचा फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेणाऱ्या संघटना, विद्यार्थ्यांना जात, धर्म, भाषा आदी विषयांवर भडकावून देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या संघटना या वेळी गप्प का? हाच मोठा प्रश्न आहे.

     शासन निर्णय काहीही होऊ देत पण यात मात्र मरण फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचेच आहे. सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा मोठा विद्यार्थी विरोधी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचा रोष ओढावून घेतला आहे. या प्रश्नावर विद्यार्थी नक्कीच आवाज उठवतील अशी अपेक्षा आहे. पण शेवटी माहे एकच म्हणणे आहे “शासनकर्त्यांनो तुम्ही लक्षात ठेवा, आजचा विद्यार्थी हाच तुमचा उद्याचा मतदार आहे”...........

You May Also Like

0 comments