Travel Blog : शिंगणापुरातील लुटारुंच्या टोळ्या होणार सक्रिय…
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनि शिंगणापूरात इतिहास घडला. सकाळी आलेल्या कावडीतील पुरुष भाविकांनी चौथर्यावर चढून शनि देवाला अभिषेक घातला. अन स्त्री पुरुष समानता असल्याचे भासवणाऱ्या देवास्थान ट्रस्टला महिलांना चौथर्यावर प्रवेश देण्याचा निर्णय अखेर न्यायालयाच्या भीतीमुळे तरी घ्यावाच लागला. त्यानंतर सायंकाळी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांनीही दर्शन घेऊन परंपरा खंडित केलीच. हा कळीचा मुद्दा एकदाचा निकाली निघाला.
Shani Dev, Shani Shinganapur |
महिलांना चौथर्यावर प्रवेश जरी ऐतिहासिक घटना असली तरी यामागे मोठे अर्थकारण फिरत आहे. काही वर्षांपूर्वीच शनि देवस्थान ट्रस्टने महत्वाचा निर्णय घेतला. चौथार्यावरून दर्शन बंदीचा. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरु असलेले पुरुषांचे दर्शन बंद झाले. त्यांनाही चौथर्याच्या खालूनच दर्शन घ्यावे लागत होते. त्यापूर्वी शनि चौथर्यावर जाउन दर्शन घेण्यासाठी पुरुषांना अंघोळ करून ओल्या वस्त्राने पान--फुल- काळी बाहुली- शनि यंत्र - देवाला वाहण्यासाठी तेल यासह यावे लागत. वास्तविक पाहता देवस्थानने या साहित्याची सक्ती केलेली नसली देवस्थानच्या बाहेरील असलेले दुकानदार हे भाविकांना या पूजा साहित्याची सक्ती करत. शनि शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांपैकी बहुतांश भाविक हे परराज्यातून येतात. या भाविकांना येथील पूजा साहित्याची किंमत माहित नसल्याने मनमानी पद्धतीने त्यांची लूटच येथील दुकानदारांकडून करण्यात येत असे.
जिल्ह्याच्या बाहेरील भाविकांना आपल्याच दुकानात आणण्यासाठी येथील दुकानदारांनी कमिशन एजंट नेमले होते. बाहेरील भाविकांच्या गाड्या शनि शिंगणापूर मध्ये दाखल होण्याआधीच ५ ते ७ किलोमीटर आधीच हे कमिशन एजंट बह्विकांच्या गाड्यांचा पाठलाग करून भाविकांना दुकानात आणत. या भाविकांनी केलेल्या खरेदीवर त्यांना कमिशन मिळत. त्यामुळे दुकानात येणाऱ्या भाविकांना पूजा साहित्याची खरेदी करण्याची सक्ती केली जात. यासाठी विरोध करणाऱ्या भाविकांना अनेकदा मारहाण केली जात असे. त्यामुळे भाविकांची आर्थिक लूट होत. या माध्यमातून शिंगणापूरला दररोज साधारणतः १ कोटींची उलाढाल होत असत. वारंवार घडणारे वादाचे प्रसंग थांबवावेत यासाठी देवस्थानने पुरुषांनाही चौथर्यावरून दर्शन बंदीचा निर्णय घेतला होता.
या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट बऱ्याच प्रमाणात थांबली होती. एजंटांचाही त्रास कमी झाला होता. परंतु या निर्णयाने परिसरातील एजंट म्हणून काम करणारे अनेक बेरोजगार झाले. त्याचप्रमाणे दररोज होणारी कोट्यावधींची उलाढालही कमालीची मंदावली. पाच -सहा वर्षांपूर्वी वेगाने वाढत असलेल्या शिंगणापूरची वाढच यामुळे रोखली गेली होती. बाजारपेठ ओस पडल्यागत झाली होती.
या बाजारपेठेला उभारणी देण्याची खरी गरज होती. या गरजेला धावून आली ती तृप्ती देसाई यांची स्त्री-पुरुष समानता. अचानक तीन महिन्यांपूर्वी पुढे आलेल्या या मागणीला देशभरात मोठी प्रसिद्धी लाभली. दोन वेळेस चौथर्यावर जाण्याचा प्रयत्न फसल्यावर न्यायालयाने अखेर देवस्थान ट्रस्टचे कान आपल्या निकालातून उपटले. घटनेतील स्त्री-पुरुष समानता दाखवून त्याप्रमाणे कारवाई करण्याचे फर्मान सोडले. सुरुवातीस अस्पष्ट भूमिका घेणारे देवस्थान गावकऱ्यांच्या छुप्या पाठींब्यामुळे आपल्या मागणीवर ठाम होते. परंतु गुढी पाडव्याला गावातील युवक हे शनि मूर्तीला काशीहून आणलेल्या पाण्याने अभिषेक घालण्याची परंपरा होती. या परंपरेला देवस्थानने मोडण्याचा घाट घातला. परंतु देवस्थानला न जुमानता गावातील युवकांनी शनि मूर्तीला अभिषेक घातला. अन देवस्थानला महिला प्रवेशाला संमती द्यावी लागली.
त्यामुळे भाविकांचे चौथरा दर्शन पुन्हा सहा वर्षांनी सुरु झाले. आता पुन्हा या दुकानदारांच्या टोळ्या शिंगणापूर परिसरात सक्रिय होणार आहेत. भाविकांना अडवणूक करून लुटण्याचा धंदा पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे दर्शन पुन्हा सुरु होण्याचा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी या निर्णयाला आता आर्थिक किनार असल्याचे दिसते. देवस्थानला जर हा निर्णय घ्यायचाच होता तर हे प्रकरण इतके दिवस का लांबविण्यात आले. त्यासाठी दुकानदारांनी पद्धतशीररित्या लॉबिंग तर केले नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. ©✔
0 comments