Tuesday, April 12, 2016

चौथरा प्रवेशाने मिळणार अर्थकारणाला चालना!
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत शनि देवस्थानने अखेर शनि चौथरा महिलांसाठी खुला केला. शिंगणापूर मधील स्थानिकांना जरी हा देवस्थानचा निर्णय पटला नसला तरी या ऐतिहासिक निर्णयामुळे शनि शिंगणापूर व परिसरातील अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून रोजगारातही मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. पूजेच्या साहित्याची विक्री दोन दिवसात पुन्हा वाढली असून येथील रूढी, परंपराही मोठ्या प्रमाणावर बदलल्या आहेत.

घरांना दरवाजा, खिडक्या नाहीत, आणि महिलांना चौथरा प्रवेश नाही, हीच काय ती शिंगणापूरची विशेषता. आधी नरेंद्र दाभोलकर आणि त्यानंतर आलेल्या तृप्ती देसाई यांनी या गावाच्या विशेषतेलाच आव्हान दिले. दाभोलकर असताना न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर थेट देसाई यांच्या आंदोलनाच्या काळातच निकाल लागला. महिलांना चौथरा बंदीची परंपरा खंडित झाल्यास येथील गर्दी कमी होऊन रोजगार कमी होतील असे वातावरण होते. मात्र परंपरा खंडित झाल्यावर गर्दीत मात्र वाढ होत असल्याचे दिसते.
आंदोलनामुळे शनि शिंगणापूर देश- विदेशात पोहोचले. आणि आता भाविकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर शिंगणापूरच्या दिशेने सुरु झाला आहे. पुरुषांना चौथर्यावर जाउन बंदी आल्यावर कमी झालेला पूजा साहित्य विक्रीचा व्यवसाय आता खुल्या दर्शन पद्धतीने पुन्हा एकदा जम बसवू पाहत आहे. साहित्य विक्रीत मुख्यत्वे शनि यंत्र, काळी बाहुली, तेल यांचा समावेश होतो. या साहित्य विक्रीसाठी पूर्वी येथील दुकानदारांनी कमिशन एजंट च्या नेमणुका केल्या होत्या. हे कमिशन एजंट जिल्ह्याच्या बाहेरील भाविकांच्या गाड्या शनि शिंगणापूर मध्ये दाखल होण्याआधीच ५ ते ७ किलोमीटर आधीच हे कमिशन एजंट बह्विकांच्या गाड्यांचा पाठलाग करून भाविकांना दुकानात आणत. या भाविकांनी केलेल्या खरेदीवर त्यांना कमिशन मिळत. त्यामुळे दुकानात येणाऱ्या भाविकांना पूजा साहित्याची खरेदी करण्याची सक्ती केली जात. यासाठी विरोध करणाऱ्या भाविकांना अनेकदा मारहाण केली जात असे. त्यामुळे भाविकांची आर्थिक लूट होत. या माध्यमातून शिंगणापूरला दररोज साधारणतः १ कोटींची उलाढाल होत असत. भाविकांच्या तक्रारीला कंटाळून देवस्थानने काही वर्षांपूर्वी पुरुषांचेही चौथरा दर्शन बंद केले होते. परंतु आता पुन्हा दुकानदारांनी या कमिशन एजंटची भरती सुरु केली आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक उलाढाल वाढणार आहे.
चौथरा प्रवेशाने फक्त आर्थिक उलाढालच वाढणार नसून अनेक रूढी, परंपराही धुळीत मिळाल्यागत झाल्या आहेत. पूर्वी चौथर्यावर प्रवेश करताना भाविकाला ओल्या वस्त्राने यावे लागत ती पद्धतही आता बंद करण्यात आली आहे. चौथर्याच्या खालून १० ते १५ मिनिटात होणार्या दर्शनाला आता होणार्या ३० ते ३५ मिनिटे लागत आहेत.


शनि शिळेची होणार झीज…
चौथर्यावरून प्रवेश सर्वांना खुला केल्यानंतर आता भाविकांचे शनि देवाच्या शिळेला हात लाऊन दर्शन सुरु आहे. अनेक भाविक हे सोबत आणलेले पूजेचे साहित्य शनि शिळेवर टाकत आहेत. तसेच गर्दी असल्याने सुरक्षा रक्षकांच्या ढकलाढकलीत अनेकदा भाविकांचे हात शिळेवर जोरात आदळत असल्याने शनि शिळेची मात्र चांगलीच झीज होणार आहे.


महिला सुरक्षा रक्षक बेरोजगार…
तृप्ती देसाई यांचे आंदोलन सुरु झाल्यावर देवस्थान ट्रस्टने चौथर्याच्या भोवती महिला सुरक्षा रक्षकांचे कडे केले होते. यात १५ पेक्षा जास्त महिलांचा समावेश होता. आता महिलाही चौथर्यावर जात असल्याने देवस्थानने नेमलेल्या महिला सुरक्षा रक्षकांचे काम थांबवले आहे. त्यामुळे या महिला सुरक्षा रक्षक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. याबाबत अध्यक्षा अनिता शेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही याचे उत्तर स्पष्टपणे देता आले नाही.


विहिरीलाही आता महिलांचा स्पर्श…
शनि शिळेला अभिषेक घालण्यासाठी शनि चौथर्याच्या मागील बाजूला विहीर आहे. पूर्वी महिलांना या विहिरीला स्पर्श करण्यासही परवानगी नव्हती. त्यासाठी महिलांनी या विहिरीला स्पर्श करू नये असा फलकही याठिकाणी लावण्यात आला होता. आता चौथरा प्रवेशानंतर या फलकावरील महिला शब्दही काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे या विहिरीलाही महिलांचा स्पर्श होणार आहे.


प्रश्न असा; लॉबिंग कुणाचे?
दर्शन पुन्हा सुरु होण्याचा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी या निर्णयाला आता आर्थिक किनार असल्याचे दिसते. देवस्थानला जर हा निर्णय घ्यायचाच होता तर हे प्रकरण इतके दिवस का लांबविण्यात आले. त्यासाठी गावातीलच एखाद्याने किंवा एखाद्या गटाने पद्धतशीररित्या लॉबिंग तर केले नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

--(पूर्वप्रसिद्धी दैनिक प्रभात दि. १० एप्रिल २०१६)

Journalist. Sub-Editor at Daily Pudhari. | also A Web/ blog Designer. At Mitra Publicity.

0 comments:

Post a Comment

Start Work With Me

Contact Us
Kedar Bhope
+91 8055373718
Ahmednagar, Maharashtra, India

Pages

Like us on Facebook